Friday, January 29, 2010

समजूत...
का बरे मी प्रेमात पडलो, असा प्रश्नच मुळी मला पडत नाही,
तू असलीस काय, नसलीस काय, माझं काहीच अडत नाही...
समोर असलीस की डोळे भरून बघून घेतो तुला,
नसलीस की तुझ्या आठवणीत जगून घेतो तुला,
असण्या-नसण्याच्या सीमांच्या व्याख्येत माझं प्रेमच बसत नाही,
तू असलीस काय, नसलीस काय, माझं काहीच अडत नाही...
आजही रोज संध्याकाळी नकळत तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसतो,
कधीतर चक्क आपल्या नेहमीच्या ठिकाणीही जाऊन बसतो,
माझ्या वागण्याचे कधी मलाच संदर्भ लागत नाहीत,
तू असलीस काय, नसलीस काय, माझं काहीच अडत नाही...
तू येणार नाहीस हे माहीत असतं मला, तरीही वाटतं,
येशीलच ऐकून माझी अधीर साद...
चंद्र-चांदण्यांतही असतील ना गं काही वाद,
पण तरीही चंद्र आकाशात आला, की चांदणंही आल्याशिवाय राहत नाही,
तू असलीस काय, नसलीस काय, माझं काहीच अडत नाही...
शिकलोय मी आता तुझ्यावाचून जगणं,
तुझ्या भासांच्या जाळ्यात स्वतःला गुरफटून टाकणं,
आता कधी मला तुझं नसणं सलत नाही,
कारण तेव्हा जणु माझाच मी उरत नाही,
तू असलीस काय, नसलीस काय, माझं काहीच अडत नाही...
का बरे मी प्रेमात पडलो, असा प्रश्नच मुळी मला पडत नाही....

Tuesday, January 26, 2010

तू...
हिंदू ना मुस्लिम ना, ना शीख ना ईसाई तू,
जन्म या मातीत दिधला जन्मदात्री आई तू...
देव अससी तूच आम्हा अस्मितेची शान तू,
धरणीलाही गौरविसी सर्वोच्च तू सन्मान तू...
पारतंत्री दीनदुबळ्यांच्या कळा असहाय तू,
परि जोखडाशी झुंजणाऱ्या वीरांची देखील माय तू...
झुंजले रणांगणी जे खड्गाची त्यांच्या धार तू,
मुक्त परि खचल्या जनांचा उद्धारता आधार तू...
शत्रूलाही रोखणाऱ्या हिमनगापरि अचल तू,
कवींची तू प्रेरणा, सुफल तू अन सुजल तू...
प्रखर सूर्यासम तळपते तेज तू अन दिव्य तू,
प्राणाहूनी तू प्रिय आम्हा धन्य तू अन वंद्य तू...

क्षण
दाट धुक्यातील पहाट्वेळी दंवासारखा आला क्षण,
ओंजळीत टिपता टिपता अलगद निसटून गेला क्षण...
कधी आठवांचे सडे घेऊनी चिंब भिजविण्या आला क्षण,
भानावर येता नयनी गहिवर ठेवून गेला क्षण...
कधी सुखाने पूर्ण ओंजळी,दुःखची कधी रेघही काळी,
हसऱ्या मेघांनाही ह्ळवी किनार देऊन गेला क्षण...
अवखळ झऱ्य़ागत बाल्यही सरले, तारुण्याचे वळणही आले,
या वळणावर वार्धक्याची चाहूल लावून गेला क्षण...
गुणगुणली प्रीतीची गाणी,साथ तिची जणु धुंद चांदणी,
चांदण्यात न्हाता विरहाची रणरण भोगून गेला क्षण...
जगताना मग हळवे अधीरे, आयुष्याचे काव्यही अधुरे,
शेवटच्या मग ओळीसंगे अंत घेऊनी आला क्षण..
तरीही एकच असे सांगणे, जगण्याचे या रुप देखणॆ,
जगून घेऊया आणखी थोडे विसरून हे सारे मीपण,
त्यावर भाळून जाण्यासाठी अजूनी एकच मिळता क्षण..

Monday, January 25, 2010

सलाम !!!
रक्तात जयाच्या धैर्य अन शस्त्र जयाच्या हाती,
तो देशासाठी जगतो मरतो तो देशासाठी...

झाले कितीक हुतात्मे, कितीच हो बलिदानी,
रंगल्या कितीक वीरश्री, इतिहासाच्या पानोपानी...
तेजस्वी परंपरेची धुरा घेऊनी हाती,
तो देशासाठी जगतो मरतो तो देशासाठी...

संपन्न मायभू ही समरांगण जेव्हा होते,
शत्रुत्वाच्या आघाताने, असहाय ती विव्हळते,
मातीतही मिसळून जाई, करी शत्रूचीही माती,
तो देशासाठी जगतो मरतो तो देशासाठी...

अजुनी कातरवेळी जीव आईचा तीळतीळ तुटतो,
चिंतेने व्याकुळ नेत्री, अश्रुंचा पाझर फुटतो,
अर्पिते बाळ स्वतःचा ती मात्रुभूमीच्यासाठी,
तो देशासाठी जगतो मरतो तो देशासाठी...

गावे किती हे पवाडे, तव शौर्य कसे वर्णावे,
तुमच्या अतुल ॠणाला उतराई कैसे व्हावे,
नतमस्तक आम्ही होतो, हा ’सलाम’ तुमच्यासाठी,
तो देशासाठी जगतो मरतो तो देशासाठी...

Friday, January 22, 2010

मनसोक्त जगून घ्यावं...
नाजुकशा कळीचं ते मोहक हास्य,
फुलणाऱ्या फुलाचं ते अबोल भाष्य,
डोळ्यात सारं साठवून मिटून घ्यावं,
जे आहे आज आहे, मनसोक्त जगून घ्यावं...
काळोखाच्या शालीवर तारकांची कोरीव नक्षी,
अनंत आकाशी भरारी घेती छोटे छोटे पक्षी,
छोट्याशा मनातील स्वप्नांना मग आशेचं बळ द्यावं,
जे आहे आज आहे, मनसोक्त जगून घ्यावं...
वाट बघणारा श्रीकॄष्ण घाली राधिकेला सुमधूर साद,
बासरीच्या सुराकडे खेचला जाई तिच्या पैंजणांचा नाद,
हळूवार या नादावर कधी आपलंही मन थिरकावं,
जे आहे आज आहे, मनसोक्त जगून घ्यावं...
सरला जरी ऋतू, जरी नसला कधी बहर,
येतील दिवस चैतन्याचे,घेऊन नव्या पालवीचा मोहर,

निसर्गाचं हे गुपित जरा आपणही जाणून घ्यावं,
जे आहे आज आहे, मनसोक्त जगून घ्यावं...
खंत...
रम्य पहाट,पक्ष्यांचे कूजन, पानांची सळसळ नि भूपाळ्यांचॆ स्वर,
राऊळीच्या घंटा कुठे खळखळ पाणी, सारे कामावर जाती,गजबज रस्त्यावर...
डोळा सवयीचे झाले असे दॄश्य रोजचे हे,रोजचा तो सूर्य त्याचे उगवणे रोजचे हे...
सारे होते सुरळीत त्यास नजर लागली
ती ’रोजची’ पहाट पुन्हा नाही उगवली...
डोळे आतुरले पार ती सकाळ पाहण्या,
फार पूर्वीची सकाळ आता सकाळ नुरली...
भास्कराचे आता असे फक्त येणे-जाणे,
दुनियेची कसरत परके होऊन पाहणे...
त्याची चूक तरी काय त्यास सवय प्रेमाची,
त्याच्या प्रेमाची आता जागा पैशाने घेतली...
फार पूर्वीची सकाळ आता सकाळ नुरली...
नाही मोकळे आकाश स्वर प्रार्थनेचे हरवले,
भांडणाचे सूर आता बंद जगात राहिले,
जीव लावणारी बोली जीवघेणी भाषा झाली,
फार पूर्वीची सकाळ आता सकाळ नुरली...
घंटानाद हा कसला आता फक्त असे वाद,
मंदिर मशिदीसाठी आता आपसांचे घात...
रांगोळीच्या जागी आता थारोळीच आली...
फार पूर्वीची सकाळ आता सकाळ नुरली...
काळ गेला आता जेव्हा होते नद्यातून पाणी,
नव्ह्त्या सीमा आकाशाला, दाहिदिशी मंजूळ गाणी...
आज उजाड माळरानी रक्तांचे पाट आले,
त्वेषापायी आकाशही गेले विभागले...
हर दिशाही आता वेदनेने विव्हळली...
फार
पूर्वीची सकाळ आता सकाळ नुरली...