Saturday, March 12, 2011

रे जीवना...

मी पाहिले जेव्हा जेव्हा वाटेवर माझ्या काटे,
रे जीवना तू सौंदर्य गुलाबाचे दाखवले...

वाटे मला जेव्हा अंधार माझ्या नशिबी लिहिला,
तू सोनसळी ऊन पहाटेचे दाखवले...

डोळ्यामध्ये माझ्या जेव्हा काळॆ आभाळ दाटले,
तू सोहळे पावसाचे माझ्यासाठी घडवले...

वाटे जेव्हा मी हरले, माझे स्वप्नही भंगले,
तुझ्या नजरेने मला मुक्त आकाश दाखवले...

वाटे एकाकी आयुष्य जसे वैराण माळरान,
माझ्या माणसांनी माझे अंगण तू सजवले...

रे जीवना मी जेव्हा विसरले गाणे जगण्याचे,
सूर आशेचे, चैतन्याचे तू माझ्यासाठी आळवले...

कसे धन्यवाद देऊ, कसे आभार मी मानू,
जगण्याचे नवे रूप पदोपदी तू दाखवले...

ऋणाईत मी तुझी गीत आज तुझे गाते,
शब्दांच्या लावण्याने तू गीत माझे खुलवले...