
बहुतेक मी तुझ्या प्रेमात पडले होते......
सगळं जग मला नवं नवंसं वाटत होतं,
तू, तुझा सहवास..सारं हवंहवंसं वाटत होतं,
तुझ्या डोळ्यात तुझ्या-माझ्या नकळत मी हरवत होते,
बहुतेक मी तुझ्या प्रेमात पडले होते......
तुझ्या केवळ आठवणीने मी मोहरून जात होते,
तुझ्या चाहुलीने मन शहारून जात होते,
रात्री स्वप्नातसुद्धा फक्त तुलाच बघत होते,
बहुतेक मी तुझ्या प्रेमात पडले होते......
तू नसताना तुझेच भास,
वेड्या या मनाला तुझाच ध्यास,
माझ्या या स्वप्नवेड्या जगात मी क्षणोक्षणी रमत होते,
बहुतेक मी तुझ्या प्रेमात पडले होते......
खूप वेळा ठरवायचे की तुला एकदा सांगायचंय,
तुझ्या-माझ्या जगात एकदा तुझ्यासोबत हरवायचंय,
तू समोर आलास की मात्र शब्दच माझे संपत होते,
बहुतेक मी तुझ्या प्रेमात पडले होते......
आणि अचानक एक दिवस.....तू आलास,
परदेशी नोकरी मिळाल्याचा आनंद तुझ्या चेहर्यावरून ओसंदून वाहत होता,
’तुला कसं कळलं?’ या तुझ्या प्रश्नातला तो भाबडा भाव मला तेव्हाही आवडत होता,
माझ्याही डोळ्यातून नकळत ’आनंदाश्रू’ वाहत होते,
कारण मी तुझ्या प्रेमात पडले होते......
तू माझं सर्वस्व असलास तरी मी तुझी मैत्रीणच होते,
म्हणूनच तुझ्या दूर जाण्याचं दुःखही हसत हसत झेलत होते,
तू खूश होतास यात सगळं आलं,म्हणून स्वतःला सावरत होते,
कारण तेव्हा मी तुझ्या प्रेमात पडले होते......
हळूहळू तू माझ्या दूर निघून गेलास,
जाताना या डोळ्याना एक सुंदर स्वप्न देऊन गेलास...
तू नाहीस म्हणून मी काही जगणं सोडलेलं नाही,
तुझ्या प्रेमानंच हे जगण्याचं शहाणपण दिलं होतं रे मला,
जेव्हा मी तुझ्या प्रेमात पडले होते......
आणि अजूनही मी तुझी वाट पाहतेय,
तुझ्या आठवणींच्या गर्दीत स्वत:चं एकटेपण घालवतेय,
तू नक्की परत येशील असा विश्वास आहे माझा,
प्रत्येकवेळी देवाला तुलाच तर मागत होते,
जेव्हा ’कधीतरी’ मी तुझ्या प्रेमात पडले होते!!!!!!!!!!
