
पाऊस...
हल्ली पाऊस आला, की कससंच होतं मला,
अशाच तर पावसात पहिल्यांदा भेटले होते तुला...
पावसाचं काय रे, तो येतो आणि निघून जातो,
पण माझं काय,
आठवांचा तो सडा हूरहूर लावून जातो माझ्या जिवाला...
पाऊस असाही...
कधी कधी या पावसाचं गणितच मला कळत नाही,
नक्की असतं तरी काय याच्या मनात?
कधी काळ्याभोर नभातूनही येत नाहीत हे महाशय,
तर कधी अवचित चमचमत्या रथातून यांची स्वारी येते लख्ख उन्हात!!!
मी आणि पाऊस...
या पावसाचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे,
धरेच्या भेटीची याची ओढ बघा ना,
सूर्याच्या डोळ्यावर काळी पट्टी बांधून
हा तिला बिनधास्त भेटतो कसा,
हे मला अजूनही न उलगडलेलं कोडं आहे...
माझं आणि या पावसाचं नक्की काहीतरी वैर आहे,
तुझ्या निघायच्या वेळी यानं बरसावं असं वाटलं, तर त्यात काय गैर आहे?
पण नाही, माझ्या मनानुसार वागेल, तो पाऊस कसला?
बघ ना, काल तुला भेटायला निघताच हा अधाशासारखा बरसला !!!
तू आणि पाऊस...
तू आणि पाऊस- दोघंही सारखेच आहात...
कितीदाही भेटलात,तरी प्रत्येक भेटीत नवखे आहात...
प्रत्येक वेळी तुमच्या प्रेमात पुन्हा पुन्हा पडावंसं वाटतं,
कधी खळखळून हसावंसं, तर कधी मोकळं रडावंसं वाटतं....

