Wednesday, August 1, 2012

पाऊस माझा सखा !!!

आसमंतातुनी दरवळला ओल्या मातीचा गंध,
खळखळून हसू लागले नदी नाले धुंद,
बिलगू लागला धरेस वारा साजन जणू तिचा,
पुन्हा एकदा बरसू लागला पाऊस माझा सखा!!!

गोजिरवाणे रुपडे त्याचे पाहून मी भाळले ,
बावरलेले मनही माझे पानापानातून न्हाले...
लाज लाजूनी धारेने ल्याला शृंगार श्रावणसरींचा ,
गडगडणारे मेघ बघुनी नाचला वेडा मोर मनीचा!!!

खरेच असे का नभी पसरले हे काजळ काळे काळे?
 की प्राण सख्याच्या ओढीने भरलेले राधेचे हे डोळे?
 उंच डोंगरा कुशीत घेती झरझरणाऱ्या धारा,
मुक्तपणाने उधळिती त्या मोत्यांचा शुभ्र पसारा!!!

वेड्या झाडांमध्ये उसळली आनंदाची लाट,
उशीर किती रे तुज झालं, मी पाहू किती तुझी वाट?
पानोपानी हिरव्या राणी सांग पुन्हा येशील ना?
तू आल्यावर तनामनातून पुन्हा असा हसशील ना?

Saturday, March 12, 2011

रे जीवना...

मी पाहिले जेव्हा जेव्हा वाटेवर माझ्या काटे,
रे जीवना तू सौंदर्य गुलाबाचे दाखवले...

वाटे मला जेव्हा अंधार माझ्या नशिबी लिहिला,
तू सोनसळी ऊन पहाटेचे दाखवले...

डोळ्यामध्ये माझ्या जेव्हा काळॆ आभाळ दाटले,
तू सोहळे पावसाचे माझ्यासाठी घडवले...

वाटे जेव्हा मी हरले, माझे स्वप्नही भंगले,
तुझ्या नजरेने मला मुक्त आकाश दाखवले...

वाटे एकाकी आयुष्य जसे वैराण माळरान,
माझ्या माणसांनी माझे अंगण तू सजवले...

रे जीवना मी जेव्हा विसरले गाणे जगण्याचे,
सूर आशेचे, चैतन्याचे तू माझ्यासाठी आळवले...

कसे धन्यवाद देऊ, कसे आभार मी मानू,
जगण्याचे नवे रूप पदोपदी तू दाखवले...

ऋणाईत मी तुझी गीत आज तुझे गाते,
शब्दांच्या लावण्याने तू गीत माझे खुलवले...

Saturday, December 11, 2010

वय म्हणजे काय?

वय म्हणजे काय, हे मला तर काही कळत नाही,
पण माझ्या कळण्या-नकळण्यानं ते वाढायचंही टळत नाही...

वय म्हणजे कदाचित वाढत जाणारी सावली असावी,
किंवा असावं उमलत्या कळीचं झालेलं डौलदार फूल,
भ्रमराला जशी गंधाची, तशी
बालपणाला तारुण्याची चाहूल...
काय करू,शब्दात या वयाची व्याख्याही बसत नाही,
वय म्हणजे काय, हे मला खरंच कळत नाही...

वय म्हणजे चंद्रकोरीचं कलेकलेने वाढणं,
की पुनवेच्या रात्री चंद्र अन तारकांचं लख्ख चांदणं?
पण मग इतकं ’सुंदर’ वय वाढलं की आपण सुखावत का नाही?
वय म्हणजे काय, हे मला तर अजिबातच कळत नाही...

वय म्हणजे बीजांकुरातून वटव्रुक्ष विस्तारलेला,
किंवा वय म्हणजे सुरवंट ’फुलपाखरू’ झालेला?
पण मग त्या फुलपाखरासारखं आपण स्वच्छंद बागडत का नाही?
वय म्हणजे काय, हे मला तर काही कळत नाही...

मी तर बुवा एक ठरवलंय,आहे तो क्षण यथेच्छ जगायचं,
आपलं आयुष्य इंद्रधनूच्या रंगांनी भरून टाकायचं,
कारण कितीही खटाटोप केला तरी वय म्हणजे काय, हे मला कधीच कळणार नाही,
पण माझ्या कळण्या-नकळण्यानं ते वाढायचंही टळणार नाही...

Monday, October 4, 2010

बहुतेक मी तुझ्या प्रेमात पडले होते......


बहुतेक मी तुझ्या प्रेमात पडले होते......

सगळं जग मला नवं नवंसं वाटत होतं,
तू, तुझा सहवास..सारं हवंहवंसं वाटत होतं,
तुझ्या डोळ्यात तुझ्या-माझ्या नकळत मी हरवत होते,
बहुतेक मी तुझ्या प्रेमात पडले होते......

तुझ्या केवळ आठवणीने मी मोहरून जात होते,
तुझ्या चाहुलीने मन शहारून जात होते,
रात्री स्वप्नातसुद्धा फक्त तुलाच बघत होते,
बहुतेक मी तुझ्या प्रेमात पडले होते......

तू नसताना तुझेच भास,
वेड्या या मनाला तुझाच ध्यास,
माझ्या या स्वप्नवेड्या जगात मी क्षणोक्षणी रमत होते,
बहुतेक मी तुझ्या प्रेमात पडले होते......

खूप वेळा ठरवायचे की तुला एकदा सांगायचंय,
तुझ्या-माझ्या जगात एकदा तुझ्यासोबत हरवायचंय,
तू समोर आलास की मात्र शब्दच माझे संपत होते,
बहुतेक मी तुझ्या प्रेमात पडले होते......

आणि अचानक एक दिवस.....तू आलास,
परदेशी नोकरी मिळाल्याचा आनंद तुझ्या चेहर्यावरून ओसंदून वाहत होता,
’तुला कसं कळलं?’ या तुझ्या प्रश्नातला तो भाबडा भाव मला तेव्हाही आवडत होता,
माझ्याही डोळ्यातून नकळत ’आनंदाश्रू’ वाहत होते,
कारण मी तुझ्या प्रेमात पडले होते......

तू माझं सर्वस्व असलास तरी मी तुझी मैत्रीणच होते,
म्हणूनच तुझ्या दूर जाण्याचं दुःखही हसत हसत झेलत होते,
तू खूश होतास यात सगळं आलं,म्हणून स्वतःला सावरत होते,
कारण तेव्हा मी तुझ्या प्रेमात पडले होते......

हळूहळू तू माझ्या दूर निघून गेलास,
जाताना या डोळ्याना एक सुंदर स्वप्न देऊन गेलास...
तू नाहीस म्हणून मी काही जगणं सोडलेलं नाही,
तुझ्या प्रेमानंच हे जगण्याचं शहाणपण दिलं होतं रे मला,
जेव्हा मी तुझ्या प्रेमात पडले होते......

आणि अजूनही मी तुझी वाट पाहतेय,
तुझ्या आठवणींच्या गर्दीत स्वत:चं एकटेपण घालवतेय,
तू नक्की परत येशील असा विश्वास आहे माझा,
प्रत्येकवेळी देवाला तुलाच तर मागत होते,
जेव्हा ’कधीतरी’ मी तुझ्या प्रेमात पडले होते!!!!!!!!!!

Sunday, September 5, 2010

अजूनही....

अजूनही कधी कधी तू येशील असं वाटतं,
तुझ्या कल्पनेनेसुद्धा आभाळ डोळ्यात दाटतं...

नंतर सुरु होतो तो अविरत बरसणारा उनाड पाऊस...
तो पाऊस, त्या जलधारा...सारं काही तसंच आहे अजूनही...
तोच रस्ता,त्याच वाटा...खुणावतात अजूनही...

पण का कोण जाणे मला हे सारे माझेच शत्रू वाटतात,
स्वतःपासूनही धावले तरी हे बरोबर वाटेत गाठतात...

मला तुला विसरायचंय, हे यांना मुळी पटतच नाही,
म्हणतात, लाटेचं अन सागराचं नातं कधी तोडूनही तुटत नाही...

खरंच इतकं गहिरं आहे का रे तुझं-माझं नातं?
अजूनही का मन माझं तुझंच गाणं गातं?

तुला जायचंच आहे ना तर खुशाल निघून जा,
जाता जाता माझ्या मनातील आठवणीही घेऊन जा...

ते करशीलही; पण तुझं काय, हा पाऊस अन या वाटा तुला नाही छळणार?
शांत समुद्रातलं आठवणींचं थैमान त्यांना नाही कळणार?

म्हणूनच अजूनही तू येशील असा विश्वास आहे,
अजूनही या राधेला क्रुष्णभेटीची आस आहे...

ही वाट तुला बोलावतेय एकदा तरी मागे बघ,
खरोखरीच आकाशात भरून आलेत काळे ढग...

पाऊसही आता बघ हळूहळू निवळतोय,
तुझ्यासाठी माझ्यासारखा तोही अधीर होतोय...

हे सगळं आपलं आहे, एकदाच परत ये,
शब्द नको आता फक्त डोळ्यांनाच बोलू दे...

पावसासारखं एकदा त्यांनाही बरसायचंय,
पुन्हा एकदा तुझ्या डोळ्यात स्वतःला विसरायचंय....

नकोस आता इतकं छळू सगळा रुसवा सोडून दे,
कितीदा रे बोलवू, परत ये, परत ये...

Friday, July 30, 2010

तू दूर दूर जाता...

तू दूर दूर जाता मी एकटीच राहिले,
क्षण अपुल्या सहवासाचे आठवात राहिले...
तू असा निघून जाता मी मलाच हरवून बसले,
ओंजळ माझी रिकामी,सारे निसटून गेले...
आता दाहीदिशांतून आभास तुझेच उरती,
वाट तुझी बघताना अविरत डोळे झरती...
आठवते का रे तुलाही ते पावसातले भिजणे,
रोजच्या त्या भेटी अन भेटींचे सारे बहाणे...
अजुनही पाऊस येतो, परी माझ्यासाठी नवखा,
तुझ्यावाचूनी मजला तोही वाटे परका...
मन माझे भरुन येते मेघ काळे बघूनी,
श्रावणातली रिमझिम होते नकळत माझ्या नयनी...
हातातून सुटला हात, परी जीव तसाच गुंतून होता,
कधीतरी येशील तू, ही एकच आस आता...
माझी अधीर अवस्था तुज कळतच नाही का रे?
एकच सांग मला की तू परत येशील का रे?

Friday, April 30, 2010

पाऊस...


पाऊस...
हल्ली पाऊस आला, की कससंच होतं मला,
अशाच तर पावसात पहिल्यांदा भेटले होते तुला...
पावसाचं काय रे, तो येतो आणि निघून जातो,
पण माझं काय,
आठवांचा तो सडा हूरहूर लावून जातो माझ्या जिवाला...

पाऊस असाही...
कधी कधी या पावसाचं गणितच मला कळत नाही,
नक्की असतं तरी काय याच्या मनात?
कधी काळ्याभोर नभातूनही येत नाहीत हे महाशय,
तर कधी अवचित चमचमत्या रथातून यांची स्वारी येते लख्ख उन्हात!!!

मी आणि पाऊस...

या पावसाचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे,
धरेच्या भेटीची याची ओढ बघा ना,
सूर्याच्या डोळ्यावर काळी पट्टी बांधून
हा तिला बिनधास्त भेटतो कसा,
हे मला अजूनही न उलगडलेलं कोडं आहे...

माझं आणि या पावसाचं नक्की काहीतरी वैर आहे,
तुझ्या निघायच्या वेळी यानं बरसावं असं वाटलं, तर त्यात काय गैर आहे?
पण नाही, माझ्या मनानुसार वागेल, तो पाऊस कसला?
बघ ना, काल तुला भेटायला निघताच हा अधाशासारखा बरसला !!!

तू आणि पाऊस...
तू आणि पाऊस- दोघंही सारखेच आहात...
कितीदाही भेटलात,तरी प्रत्येक भेटीत नवखे आहात...
प्रत्येक वेळी तुमच्या प्रेमात पुन्हा पुन्हा पडावंसं वाटतं,
कधी खळखळून हसावंसं, तर कधी मोकळं रडावंसं वाटतं....

Wednesday, April 28, 2010

हूरहूर...



सूर्य जसा मावळतो, दूर नदीच्या काठी,
आठविती मग मजला त्या नदीकाठच्या भेटी...

डोळ्यात आजही जपतो, स्वप्न तुझ्यासम रंगविलेले,
आळवितो आजही सूर तुझ्या संगतीत गवसलेले...
नसलीस जरी तू जगी या, हे गाणॆ तुझेच ओठी,
आठविती मग मजला त्या नदीकाठच्या भेटी...

वाजता कुणाचे पैंजण, उमटता तो मंजूळ नाद,
घुटमळते कानी माझ्या, तुझीच प्रेमळ साद,
क्षणार्धात का विरली जन्मोजन्मीची नाती,
आठविती मग मजला त्या नदीकाठच्या भेटी...

स्वप्नांच्या गावी अजुनी असते तुझीच चाहूल,
तुझ्याच दिशेला आजही आभास वळवितो पाऊल,
का क्षणोक्षणीचे झुरणॆ, केवळ एका भेटीसाठी,
आठविती मग मजला त्या नदीकाठच्या भेटी...

राहूनच गेलं...

राहूनच गेलं...
थोडं बोलायचंय बाळा जरा ऐकून घेशील?
तुझ्या आईला बोलण्यासाठी थोडासा वेळ देशील?
तू जन्माला आलास ना तेव्हा खूप स्वप्नं पाहिली तुझ्यासाठी,
पण आमचंच चुकलं,
स्वप्नं आपली’ बघ,’माझी’ नाही, हे शिकवायचं राहूनच गेलं...
परिस्थितीची झळ तुला लागू नये यासाठी पुरेपूर झटलो,
पण आमचंच चुकलं,
आमच्या कष्टांची जाणीव ठेव, हे शिकवायचं राहूनच गेलं...
तुझ्या शिक्षणात कसलीच आडकाठी ठेवली नाही,
तुला खूप मोठा झालेलं बघायचं होतं ना आम्हाला,
पण तरीही एक चुकलंच,
तुझी महत्वाकांक्षा जपताना तुला माणुस अन माणुसकी शिकवायचं राहूनच गेलं...
आता झालाही आहेस खूप मोठा, स्वतःची सगळी स्वप्नं जगणारा,
पण तुझी एक भेटही आम्हाला स्वप्नासारखी वाटते;
जरी परक्यांच्या देशात असलास
तरी आम्ही कायम तुझे आहोत ही आठवण द्यायचं राहून गेलं...
गेलास तेव्हा मेल, मेसेज सारं काही सुरळीत होतं,
पण तुझ्या जवळ असण्याची सर नव्हती रे कशाला,
तेव्हाही चुकलंच, तुझ्या प्रगतीपुढे आमच्या भावनांना आवरलं,
पण म्हणून तुझं स्वातंत्र्य जप,पण आमचाही कधीतरी विचार कर, हे शिकवायचं राहून गेलं...
मान्य आहे की आम्ही फक्त आमचं कर्तव्य केलं,
मुलांसाठी कष्ट करणं काही वेगळं नाही,
पण आम्हाला विसरु नकोस अशी शिकवण वेगळ्याने देणं तेवढं राहून गेलं...
जाण्यापूर्वी तुझे बाबा तुझेच नाव जपत होते,
तेव्हा बोलले, सगळं दिलं पोराला,
गेलेल्या क्षणाचं आणि माणसाचं महत्व सांगणं राहूनच गेलं...
जातानाही, खूप मोठा हो, हा निरोप ठेवून गेलेत, म्हणूनच हा खटाटोप करतेय,
आज तुझ्याकडे थोडा वेळ मागतेय,
बाकी बर्याच गोष्टी राहून गेल्या, जाता जाता खंत नको की चुका मान्य करायचं राहून गेलं...
तू खूप खूप मोठ्ठा हो, आशीर्वाद तर आहेच,
पण काही चुका अक्षम्य असतात,हेही शिकून घे जमलं तर;
कारण मला तर संधी मिळाली चुका मान्य करण्याची,
पण तसं झालं नाही तर ते पचवण्यासाठी लागणारं बळ तुला द्यायचंही राहूनच गेलं....

Friday, January 29, 2010

समजूत...
का बरे मी प्रेमात पडलो, असा प्रश्नच मुळी मला पडत नाही,
तू असलीस काय, नसलीस काय, माझं काहीच अडत नाही...
समोर असलीस की डोळे भरून बघून घेतो तुला,
नसलीस की तुझ्या आठवणीत जगून घेतो तुला,
असण्या-नसण्याच्या सीमांच्या व्याख्येत माझं प्रेमच बसत नाही,
तू असलीस काय, नसलीस काय, माझं काहीच अडत नाही...
आजही रोज संध्याकाळी नकळत तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसतो,
कधीतर चक्क आपल्या नेहमीच्या ठिकाणीही जाऊन बसतो,
माझ्या वागण्याचे कधी मलाच संदर्भ लागत नाहीत,
तू असलीस काय, नसलीस काय, माझं काहीच अडत नाही...
तू येणार नाहीस हे माहीत असतं मला, तरीही वाटतं,
येशीलच ऐकून माझी अधीर साद...
चंद्र-चांदण्यांतही असतील ना गं काही वाद,
पण तरीही चंद्र आकाशात आला, की चांदणंही आल्याशिवाय राहत नाही,
तू असलीस काय, नसलीस काय, माझं काहीच अडत नाही...
शिकलोय मी आता तुझ्यावाचून जगणं,
तुझ्या भासांच्या जाळ्यात स्वतःला गुरफटून टाकणं,
आता कधी मला तुझं नसणं सलत नाही,
कारण तेव्हा जणु माझाच मी उरत नाही,
तू असलीस काय, नसलीस काय, माझं काहीच अडत नाही...
का बरे मी प्रेमात पडलो, असा प्रश्नच मुळी मला पडत नाही....