राहूनच गेलं...
थोडं बोलायचंय बाळा जरा ऐकून घेशील?
तुझ्या आईला बोलण्यासाठी थोडासा वेळ देशील?
तू जन्माला आलास ना तेव्हा खूप स्वप्नं पाहिली तुझ्यासाठी,
पण आमचंच चुकलं,
स्वप्नं आपली’ बघ,’माझी’ नाही, हे शिकवायचं राहूनच गेलं...
परिस्थितीची झळ तुला लागू नये यासाठी पुरेपूर झटलो,
पण आमचंच चुकलं,
आमच्या कष्टांची जाणीव ठेव, हे शिकवायचं राहूनच गेलं...
तुझ्या शिक्षणात कसलीच आडकाठी ठेवली नाही,
तुला खूप मोठा झालेलं बघायचं होतं ना आम्हाला,
पण तरीही एक चुकलंच,
तुझी महत्वाकांक्षा जपताना तुला माणुस अन माणुसकी शिकवायचं राहूनच गेलं...
आता झालाही आहेस खूप मोठा, स्वतःची सगळी स्वप्नं जगणारा,
पण तुझी एक भेटही आम्हाला स्वप्नासारखी वाटते;
जरी परक्यांच्या देशात असलास
तरी आम्ही कायम तुझे आहोत ही आठवण द्यायचं राहून गेलं...
गेलास तेव्हा मेल, मेसेज सारं काही सुरळीत होतं,
पण तुझ्या जवळ असण्याची सर नव्हती रे कशाला,
तेव्हाही चुकलंच, तुझ्या प्रगतीपुढे आमच्या भावनांना आवरलं,
पण म्हणून तुझं स्वातंत्र्य जप,पण आमचाही कधीतरी विचार कर, हे शिकवायचं राहून गेलं...
मान्य आहे की आम्ही फक्त आमचं कर्तव्य केलं,
मुलांसाठी कष्ट करणं काही वेगळं नाही,
पण आम्हाला विसरु नकोस अशी शिकवण वेगळ्याने देणं तेवढं राहून गेलं...
जाण्यापूर्वी तुझे बाबा तुझेच नाव जपत होते,
तेव्हा बोलले, सगळं दिलं पोराला,
गेलेल्या क्षणाचं आणि माणसाचं महत्व सांगणं राहूनच गेलं...
जातानाही, खूप मोठा हो, हा निरोप ठेवून गेलेत, म्हणूनच हा खटाटोप करतेय,
आज तुझ्याकडे थोडा वेळ मागतेय,
बाकी बर्याच गोष्टी राहून गेल्या, जाता जाता खंत नको की चुका मान्य करायचं राहून गेलं...
तू खूप खूप मोठ्ठा हो, आशीर्वाद तर आहेच,
पण काही चुका अक्षम्य असतात,हेही शिकून घे जमलं तर;
कारण मला तर संधी मिळाली चुका मान्य करण्याची,
पण तसं झालं नाही तर ते पचवण्यासाठी लागणारं बळ तुला द्यायचंही राहूनच गेलं....

khupch chhan.......satya paristhiti...khup avadali mala tar.....
ReplyDeletemazya mom la khup aavadli...khup divasani marathi vachatey n tyatun marathi kavita....
ReplyDeleteतुझ्या वयाला न शोभणारे लिहितेस, पल्लवी..
ReplyDeleteपण खूप छान गं.. अगदी विचारपूर्वक मांडणी आहे शब्दांची..
जरी परक्यांच्या देशात असलास
तरी आम्ही कायम तुझे आहोत ही आठवण द्यायचं राहून गेलं...
-- ह्या ओळी चर्र करून गेल्या..
व्वा..
अ ग पल्लवी,
ReplyDeleteकिती छान लिहीतेस ग... !!!!
' राहुनच गेलं ' ह्या कवितेतील ओळी अंतर्मुख करुन गेल्या.
सर्वच आवडल्या. लिहीत रहा.