Wednesday, August 1, 2012

पाऊस माझा सखा !!!

आसमंतातुनी दरवळला ओल्या मातीचा गंध,
खळखळून हसू लागले नदी नाले धुंद,
बिलगू लागला धरेस वारा साजन जणू तिचा,
पुन्हा एकदा बरसू लागला पाऊस माझा सखा!!!

गोजिरवाणे रुपडे त्याचे पाहून मी भाळले ,
बावरलेले मनही माझे पानापानातून न्हाले...
लाज लाजूनी धारेने ल्याला शृंगार श्रावणसरींचा ,
गडगडणारे मेघ बघुनी नाचला वेडा मोर मनीचा!!!

खरेच असे का नभी पसरले हे काजळ काळे काळे?
 की प्राण सख्याच्या ओढीने भरलेले राधेचे हे डोळे?
 उंच डोंगरा कुशीत घेती झरझरणाऱ्या धारा,
मुक्तपणाने उधळिती त्या मोत्यांचा शुभ्र पसारा!!!

वेड्या झाडांमध्ये उसळली आनंदाची लाट,
उशीर किती रे तुज झालं, मी पाहू किती तुझी वाट?
पानोपानी हिरव्या राणी सांग पुन्हा येशील ना?
तू आल्यावर तनामनातून पुन्हा असा हसशील ना?

No comments:

Post a Comment